पाटणा - दानापूर येथील फुलवारीशरीफ मधून शनिवारी रमजान संबधी मोठी बातमी समोर आली आहे. फुलवारीशरीफ येथील मुस्लीम समुदायाची मोठी संस्था इमारत- ए- शरियाचे मुख्य नाजिम शिबली कासमी यांनी एक पत्र जाहीर केले आहे. यामध्ये सर्वांना आपआपल्या घरातूनच नमाज पढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात आपापल्या घरात राहूनच नमाज पठण करा, तसेच लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
रमजान महिना हा मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना असतो. या खास महिन्यात सर्व मुस्लीम बांधव महिनाभर रोजे करतात. तसेच, या काळात गरीब, गरजु व्यक्तींना मदत केली जाते. या महिन्यात आपल्या सर्व चुकांसाठी माफी मागितली जाते. त्यामुळे रमजानचे महत्व जास्त आहे, असे शिबली म्हणाले.
रमजानच्या महिन्यात इफ्तारचे दीड तास संपल्यानंतर तरावीचा नमाज पठण केला जातो. यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांना घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे रमजानच्या महिन्यातही सर्व मुस्लीम बांधवांनी घरात राहूनच नमाज पठण करावे. तसेच, गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.