भोपाळ - 'नागरिकांचा जीव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येऊ शकती. पण जर नागरिकांचा जीव जात असेल तर त्यांना आपण माघारी आणू शकत नाही. जर गरज पडली तर लॉकडाऊन वाढवण्यात येईल, परिस्थीती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मत व्यक्त केले आहे.
देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. काल दिवसभरात देशात 700पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांचा आकडा 4 हजार 421वर पोहचला आहे. त्यातील 3 हजार 981 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
रुग्णांची वाढती संख्या पाहता देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊन उठवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी राज्यसरकारांकडून कल्पना मागविल्या आहेत. काल तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी दोन आठवड्यांनी संचारबंदी वाढविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. तर आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संचारबंदी वाढविण्याचे संकेत दिले आहेत.