नवी दिल्ली - कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यास छावला येथील ४०६ जणांना एका आठवड्यानंतर डिस्चार्ज देण्यात येईल, असे इंडो-तिबेटन सीमा पोलिसांनी (आयटीबीपी) शुक्रवारी म्हटले आहे.
आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक पांडे यांनी ४०६ जणांना येथील शिबिरात ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे. 'या सर्वांच्या अंतिम टप्प्यातील काही चाचण्या सुरू आहेत. काल २४९ जणांचे तर, आज १५७ जणांचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. या सर्व तपासण्या अधिकृत प्रयोगशाळांमध्ये सुरू आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत आम्हाला त्यांचे अहवाल मिळतील,' असे ते म्हणाले.
'या सर्वांचे अंतिम अहवाल निगेटिव्ह आले म्हणजेच यांना कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचे निश्चित झाले तर, त्यांना पुढील आठवड्यात घरी पाठवण्यात येईल. मात्र, त्यांना खबरदारी म्हणून काही सूचनाही देण्यात येतील,' असे त्यांनी सांगितले.
छावला येथे एकूण ४०६ लोक असून ते चीनमधील वुहान येथून भारतात परतले आहेत. या प्रांतात कोरोना विषाणूने सर्वाधिक थैमान घातले आहे. मागील महिन्याच्या सुरुवातील या भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले होते.
मागील १६-१७ दिवसांपासून या लोकांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या तपासणी अहवालांनुसार, त्यांना घरी पाठवण्यात येणार किंवा नाही, याविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे. या शिबिरातील दोघांना खोकला आणि तापामुळे बुधवारी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले होते. या सर्व जणांच्या प्राथमिक कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.