हैदराबाद : एका कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या ४० वर्षीय कामगाराची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली. परंतु त्याला कसलीच लक्षणे नव्हती. त्याला कुणाकडून संसर्ग झाला असावा, हेही समजलेले नाही. जवळच्या रूग्णालयात त्याने इतरांबरोबरच कोरोनाची चाचणी करून घेतली. विलगीकरणात तो घरीच राहून आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेली औषधे घेत राहिला. सुरूवातीला त्याला हलका ताप आणि खोकला अशी लक्षणे होती, तरीही एकूण १७ दिवसांपैकी ७ दिवसांमध्ये त्याची ही लक्षणेही संपुष्टात आली. तरीही, चार आठवड्यांनंतरही, त्याच्या दुकानाचा मालकाने त्याला कामावर येण्याची परवानगी दिली नाही. एक महिन्यापासून तो कामावर हजर राहिला नसल्याने, त्याचा पगार रोखण्यात आला आहे. माझ्या कुटुंबाला आता दोन्ही वेळचे जेवण मिळवणे अवघड जात आहे, असे त्याने सांगितले.
एका ३२ वर्षीय घरगुती कामवालीला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान करण्यात आले. त्या अपार्टमेंट संकुलातील सर्व रहिवाशांच्या कोविड चाचणी करण्याच्या प्रक्रियेत, तिचीही चाचणी करण्यात आली आणि ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. परंतु तिच्यात तशी कोणतीच लक्षणे नव्हती. तरीसुद्धा, तिने जीएचएमसी कर्मचाऱ्यांनी दिलेली औषधांचा उपयोग केला. कोणत्याही लक्षणांशिवाय १० दिवस गेले. तरीही तिला आणखी दोन आठवडे अपार्टमेंट संकुलात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असे स्पष्ट सांगण्यात आले. तिचा पती हा ऑटो चालवतो आणि त्यांना दोन मुले आहेत. सध्याच्या स्थितीमुळे, त्याचा व्यवसाय बंदच आहे. आता तीही कामावर जात नसल्याने, आर्थिक विवंचनांनी कुटुंबाला गुदमरवून टाकले आहे.
कर्मचारी, व्यापारी, कामगार... कोरोनाने प्रत्येक समुदायाला चिरडून टाकले आहे. तुम्ही जर पॉझिटिव्ह आढळलात, तर तुम्हाला कित्येक आठवडे कामावर हजर रहाता येत नाही. अगदी लक्षणे नसतानाही, बहुतेक लोकांना एका महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी घरीच रहावे लागले आहे. सामान्य जीवनमानावर याचा अत्यंत तीव्र असा परिणाम होत आहे. अनेक आठवडे काम नसल्याने, किरकोळ कामगार आणि रोजंदारीवर काम करणार्यांना अत्यंत दयनीय परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अनेक जण तर कर्मचारी जोपर्यंत कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र घेऊन येत नाहीत, तोपर्यंत त्यांना कामावर परत घेऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगत आहेत. परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेले बळी द्विधावस्थेत खितपत आहेत. प्रख्यात डॉक्टर एम व्ही राव यांनी त्यांच्यासमोर कोविड चाचणीसंदर्भात उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करताना सांगितले की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने जी मार्गदर्शक तत्वे जाहिर केली आहेत, त्यानुसार ज्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये लक्षणे दिसलेली नाहित, ते १७ दिवसांनंतर कामावर परत येऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विशिष्ट कालावधीनंतर फेरचाचणीची गरज नाही, असे त्यात म्हटले आहे.
१० अधिक ७ दिवसांसाठीच विलगीकरण..
- ८५ टक्के पॉझिटिव्ह प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यांच्याही नकळत, विषाणुचा संसर्ग होतो आणि काही काळानंतर तो नष्ट होतो.
- अशा पॉझिटिव्ह चाचणी असलेल्या लोकांसाठी घरीच विलगीकरणात रहाणे चांगले आहे.
- जर त्यांच्याकडे अतिरिक्त खोली किंवा स्वतंत्र स्नानगृह नसेल तर ते सरकारी विलगीकरण केंद्रात राहू शकतात.
- अशा प्रकारच्या पॉझिटिव्ह प्रकारातील रूग्णांनी १० दिवस विलगीकरणात रहावे. त्यानंतर त्यांनी ७ दिवसांपर्यंत आपल्याला ताप, खोकला, सर्दी आणि थकवा अशी लक्षणे आहेत काय यावर स्वतःच निरिक्षण करावे.
- मुदत समाप्त होईपर्यंत अशी कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, तर ते कोरोनामुक्त असल्याचे समजले जावे.
- याचा अर्थ असा आहे की १७ दिवसांनंतर, ते आपापल्या कामावर नेहमीप्रमाणे हजर राहू शकतात.
सौम्य लक्षणे असलेल्यांसाठीसुद्धा..
- अगदी सौम्य लक्षणे ज्यांच्यात आहेत, तेही आपल्या घरीच विलगीकरणात राहू शकतात. मात्र त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले पाहिजेत.
- जे चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांना १० दिवसांपर्यंत निरिक्षणाखाली ठेवले पाहिजे. शेवटच्या ३ दिवसांत ताप नसेल, तर त्यांनी उरलेले ७ दिवस घरीच विश्रांती घ्यावी परंतु त्यांना निरिक्षणाखाली ठेवले जावे.
- एकूण शेवटच्या १० दिवसांत कोणतीच लक्षणे आढळली नाहीत तर, त्यांनाही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान करूनही १७ दिवसांनंतर कामावर हजर रहाता येईल.
- जर पुन्हा लक्षणे दिसू लागली तर, नेहमीप्रमाणे विलगीकरण पुढे सुरू ठेवावे. कामावर पुन्हा हजर होतानाही हेच नियम लागू आहेत.
- जे रूग्णालयात दाखल आहेत आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत, त्यांच्यावर डिस्चार्ज मिळाल्यावर घरीच एक आठवडाभर देखरेख ठेवली जावी. त्यावेळी लक्षणे पुन्हा दिसली नाहीत तर, ते कामावर पुन्हा हजर राहू शकतात. लक्षणे कायम राहिली तर, पुन्हा कामावर जाण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला, उपचार आणि त्यांची मंजुरी हे अत्यावश्यक आहेत.