नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाच्या अपघातग्रस्त झालेल्या एनएन-३२ विमानातील मृत्यू पावलेल्या १३ जवानांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आसामच्या जोरहाट विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान बेपत्ता झाले होते. अरुणाचल प्रदेशातील लिपो येथे समुद्र सपाटीपासून १२ हजार फुटांवर AN-32 विमान कोसळले होते.
या १३ जणांनी गमावले अपघातात प्राण –
विंग कमांडर जी. एम. चार्ल्स, स्क्वाड्रन लीडर एच. विनोद, फ्लाइट लेफ्टनंट आर. थापा, फ्लाइट लेफ्टनंट ए. तंवर, फ्लाइट लेफ्टनंट एस. मोहांती, फ्लाइट लेफ्टनंट एम. के. गर्ग, वॉरंट ऑफिसर के. के. मिश्रा, सार्जंट अनुप कुमार, कॉर्पोरल शेरीन, लीड एअरक्राफ्ट मॅन एस. के. सिंह, लीड एअरक्राफ्ट मॅन पंकज, कर्मचारी पुताली आणि राजेश कुमार यांचा अपघातामधील मृतांमध्ये समावेश असल्याचे भारतीय वायुसेनेकडून सांगण्यात आले आहे.
अपघातग्रस्त एनएन-३२ विमानाचा संपूर्ण सांगाडा गुरूवारी सकाळी शोध पथकाला हाती लागला. दुपारनंतर या सर्वांचे मृतदेह हाती लागले. तसेच, येथे ब्लॅक बॉक्स देखील सापडल्याची माहिती समोर आली. या अपघातात मरण पावलेल्या वायूसेनेच्या सर्व १३ जवानांची छायाचित्रे जाहीर करण्यात आली आहेत. गुरूवारी सकाळी शोधपथक जेव्हा अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्याजवळ पोहचले, तेव्हा तेथे त्यांना कोणाच्याही मृतदेहाचे अवशेष आढळले नव्हते. मात्र, अपघाताची भीषणता लक्षात घेऊन सर्व १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे वायुसेनेकडून त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले होते.
शोध पथकात वायुसेना, लष्कराच्या जवानांसह गिर्यारोहकांचाही समावेश होता. ३ जून रोजी एएन-३२ विमानाने जोरहाट येथून उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३३ मिनिटांनंतर विमानाचा संपर्क तुटला होता. विमानात ८ क्रू मेंबर्ससह एकूण १३ जण होते. हे विमान अरूणाचल प्रदेशातील मेचुका येथे जाणार होते. मेचुका हे ठिकाण भारत-चीन सीमेवरील अरूणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्याचा एक छोटा भाग आहे. या अगोदर मंगळवारी सियांग जिल्ह्यात एएन-३२ चे काही अवशेष आढळून आले होते. यामुळे दुर्घटना घडल्याच्या शक्यतेला पुष्टी मिळाली होती. दुर्घटना घडलेले ठिकाण अत्यंत उंचावर व घनदाट जगंलात असल्याने विमानाच्या संपूर्ण ढिगाऱ्या जवळ पोहोचणे आव्हानात्मक होते.