चंदीगड - हिमाचल प्रदेशच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये ५१ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ मालवाहू विमानाचे अवशेष लष्कराच्या डोग्रा स्काऊटस तुकडीने यशस्वीपणे शोधून काढले आहेत. त्या विमानातील सर्व १०२ व्यक्ती ठार झाल्या होत्या, भारतीय लष्करातर्फे ही माहिती देण्यात आली.
वेस्टर्न कमांडने ९० बेपत्ता लोकांचे अवशेष शोधण्यासाठी २६ जुलैला या शोध मोहिमेला सुरुवात केली होती. AN-12 BL-534 हे विमान 7 फेब्रुवारी 1968 ला कुल्लू जिल्ह्यातील रोहतांग येथून बेपत्ता झाले होते. १३ दिवस कसून शोधकार्य केल्यानंतर ५,२४० मीटर उंचीवर ढाका हिमनदीच्या क्षेत्रात हे अवशेष सापडले. यात एअरो इंजिन, वायरी, इलेक्ट्रिक सर्किट््स, पंखे, इंधन टाकीचे भाग, ब्रेकची यंत्रणा व कॉकपिटचा दरवाजा असे विमानाचे अवशेष शोधून काढण्यात आले. याखेरीज विमानातील जवानांच्या काही व्यक्तिगत वस्तूही सापडल्या.
ज्या भागात हे विमान कोसळले होते तेथे कित्येक वर्षांच्या हिमस्खलनाने बर्फाचे मोठे थर साजलेले होते व आताही तेथे सतत बर्फाच्या दरडी कोसळत असतात. शिवाय पातळ बर्फाच्या थराने झाकलेल्या फसव्या आणि घातक दऱ्याही बऱ्याच असल्याने त्या ठिकाणी पोहोचणे हेच मोठे खडतर काम होते.
कुटुंबियांच्या आशा पल्लवित
हे विमान अचानक बेपत्ता झाले तेव्हा ते नाईलाजाने शत्रूच्या प्रदेशात उतरले असावे व त्यातील सर्वांना कैद केले गेले असावे, असा समज निर्माण झालो होता. २००३ मध्ये गिर्यारोहकांच्या एका हिमनदीपाशी त्या विमानातील एका जवानाचे ओळखपत्र योगायोगाने सापडले आणि विमान गायब होण्याच्या रहस्याचा उलगडा झाला. आता स्वजनांची निदान पार्थिवे तरी अंत्यसंस्कारांसाठी मिळतील, अशा कुटुंबियांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यानंतर अपघातातील मृतदेह परत आणण्यासाठी अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. पण आत्तापर्यंत फक्त पाच मृतदेह मिळू शकले अहेत.