हैदराबाद - देशभरात लॉकडाऊनमुळे दारुची दुकाने बंद आहेत. त्यामुळे तळीरामांचा रोजच उपवास घडत आहे. यातच हैदराबादचा एक व्यक्ती, शहरातील लोकांना रस्त्यांवरती फिरून दारुचे पेग वाटत असल्याची माहिती समोर आली आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या व्यक्तीने असे करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने सांगितले, की काल माझ्या ऑफिसमधून घरी जात असताना मला दिसले, की एका महिलेचे संपूर्ण शरीर थरथरत होते. तिला दारुचे गंभीर व्यसन होते. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून तिला दारु न मिळाल्यामुळे तिची ही परिस्थिती झाली होती. तिला धड उभेही राहता येत नव्हते, त्यामुळे तिला नंतर रुग्णालयात हलवण्यात आले.
नंतर माझ्या लक्षात आले, की असे बरेच लोक आहेत ज्यांना लॉकडाऊनमुळे असा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे माझ्या घरी असलेली दारुची बाटली घेऊन मी त्यातील दारुचे पेग अशा लोकांना वाटण्यास सुरुवात केली. हे करण्यामागचा आपला उद्देश केवळ अशा गरजू लोकांना मदत करणे हा असल्याचेही कुमारने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, तेलंगाणा सरकारने राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेला लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. म्हणजेच, तळीरामांना पुढील दोन आठवड्यांपर्यंत तरी दारु मिळण्याची शक्यता नाही, असे दिसते.
हेही वाचा : द्वारका पोलिसांकडून मोफत कॅबची व्यवस्था, 'हे' व्यक्ती घेऊ शकतात लाभ