हैदराबाद - केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूने संतप्त झालेल्या हैदराबादमधील एका व्यक्तीने दोषींची माहिती देणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. जेव्हा एखादा मोठा गुन्हा घडतो आणि पोलिसांकडे धागेदोरे नसतात तेव्हा माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून बक्षीस जाहीर करण्यात येते. त्याचप्रकारे प्राण्यांची हत्या करणाऱ्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस द्यायला हवे, असे बी. टी श्रीनिवास या व्यक्तीने सांगितले.
श्रीनिवास हे युनायटेड फेडरेशन ऑफ रेसिडेन्ट वेलफेअर असोशिएशन, ग्रेटर हैदराबादचे सचिव आहेत. केरळमध्ये अनेक हत्तींची हत्या होत आहे. बक्षीस म्हणून जाहीर केलेल्या रकमेमुळे गुन्हेगारांवर जरब बसेल आणि हत्तींची हत्या होणार नाही.
जेव्हा केरळमध्ये हत्तीचा मृत्यू होतो. तेव्हा माध्यमे आणि सोशल मीडियातून संताप व्यक्त केला जातो, आणि काही दिवसांतच लोक ती घटना विसरून जातात. मात्र, यावर ठोस कारवाईची गरज आहे. जर कोणी गुन्हेगारांची माहिती पोलिसांना पोहचवली आणि त्यामुळे त्यांना पकडण्यास मदत झाली तर तर केरळच्या पशुवैद्यकीय विभागाकडे दोन लाख रुपये देणार असल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले.
गुन्हेगारांना शिक्षा झाल्यानंतरच माहिती देणाऱ्यांला बक्षिसाची रक्कम देण्यात यावी, कारण न्यायालयात खटला लांबूही शकतो. गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याचा माझा हेतू असून याबाबत केरळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. हत्ती आणि इतर प्राण्यांची हत्या थांबविण्याचा माझे प्रयत्न मी त्यांना पत्रात लिहल्याचे श्रीनिवास म्हणाले.