हैदराबाद - हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे एन्काऊंटर करण्यात आला आहे. या आरोपींची नावे मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी होती. त्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. या प्रकरणातील पीडितेचे नाव बदलून 'जस्टिस फॉर दिशा' अशा सूचना सायबराबादचे आयुक्त सज्जनार यांनी दिली होती.
हैदराबाद येथे 27 नोव्हेंबरला महिला डॉक्टरवर बलात्कारनंतर हत्या करून तिला जाळण्यात आले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी अनेक शहरांमध्ये आंदोलने करण्यात आली. पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आता विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) आता चालणार होता.
कशी घडली होती घटना -
बुधवारी रात्री रुग्णालयातून घरी जात असताना महिलेच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे त्या महामार्गावरील टोल प्लाझाजवळ थांबल्या होत्या. तेव्हा चार आरोपींनी महिलेवर बलात्कार करून त्यांचा खून केला होता. तसेच त्यांचा मृतदेह जाळला होता. शेवटी महिलेचे तिच्या बहिणीशी बोलणे झाले होते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्यांच्या बहिणीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद असल्याचे समजले. त्यानंतर दिवसभर शोधाशोध केल्यानंतर बुधवारी सायंकाळी बहिणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.