हैदराबाद - नागरिकत्व (सुधारणा) कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलन शांततेत चालू राहण्याऐवजी अशीच हिंसा होत राहिल्यास आपण या सरकारला विरोध करण्यापासून स्वतःहून बाजूला होऊ, असे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. आज हैदराबादमध्ये एआयएमआयएमच्या कार्यालयात 'युनायटेड मुस्लीम अॅक्शन कमिटी'ची बैठक झाली. यानंतर ओवेसी बोलत होते.
'आम्ही हिंसात्मक आंदोलनाचा निषेध करतो. जे कोणी हिंसेमध्ये सहभागी आहेत, ते आंदोलन आणि विरोध प्रदर्शनाचे शत्रू आहेत. शांततेने केलेले आंदोलनच सफल होईल,' असे ओवेसी यांनी म्हटले आहे. 'आम्ही या कायद्याच्या विरोधात आहोत. सरकार खोटे बोलत आहे. केवळ नागरिकत्व (सुधारणा) कायद्याचा विचार करू नका. त्याच्यासोबत येऊ घातलेल्या एनआरसीचाही विचार करा. हे केवळ मुस्लिमांसाठीच नाही तर, देशातील बहुसंख्य जनतेसाठी घातक ठरणार आहे,' असे ते म्हणाले.
'या कायद्याला जोरदार विरोध झाला पाहिजे. मात्र, आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी घेतली पाहिजे. त्यानंतर शांततेत आंदोलन झाले पाहिजे,' असे ओवेसी म्हणाले.
'लखनौ आणि दिल्लीमध्ये पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केली. तर, मंगळुरू येथेही दोन मुस्लिमांचा मृत्यू झाला. या हिंसेचाही आम्ही निषेध करतो. आम्ही पोलिसांनाही शांततेने परिस्थिती हाताळण्याची विनंती करतो. आम्हीही त्यांना सहकार्य करू,' असे ओवेसी म्हणाले.