चादरघाट (तेलंगणा) - तेलंगणाच्या हैद्राबादमध्ये वडिलांच्या नावाला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. हैदराबाद येथील चादरघाट येथे एका महिन्याच्या बाळाला वडिलांनीच 70 हजार रुपयांसाठी विकल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात बाळाच्या आईने चादरघाट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता, ही घटना उघडकीस आली. दारुच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने पैशासाठी त्याने बाळाला विकल्याची माहिती आहे.
पोलिसांनी बाळाची सुटका केली असून आरोपी वडिलांना अटक केली आहे. पोलिसांनीही बाळाला आईकडे सोपवून आरोपी व्यक्तीची चौकशी केली. आरोपीने खरेदीदाराकडून 70 हजार रुपये घेत, आपल्या मुलाला विकले. चादरघाट पोलिसांनी भादंवि कलम 317 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
यापूर्वच्या घटना -
कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बहुतांश नागरिकांचा उद्योगधंदा ठप्प झाला. हाताचं काम सुटल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दारुच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलाला 5 लाखांत तृतीयपंथीला विकल्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. तसेच गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये एका बापाने नकोशा असलेल्या आपल्या अडीच महिन्याच्या मुलीला विकल्याची घटना समोर आली होती. दिल्ली महिला आयोग आणि पोलिसांनी मध्य दिल्लीच्या हौज काजी परिसरातून त्या चिमुकल्या मुलीची सुटका केली होती.