नवी दिल्ली - हरियाणाच्या पानिपतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सनौली खुर्द येथे राहणाऱ्या एका महिलेला तीच्या पतीने जवळपास दीडवर्ष शौचालयामध्ये बंद ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला संरक्षण अधिकाऱ्यांनी कारवाई करत संबधित महिलेची सुटका केली आहे. तर आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
प्रोटेक्शन अधिकारी रजनी गुप्ता या पोलिसांसह संबधित महिलेच्या घरी पोहचल्या. यावेळी त्यांनी महिलेबाबत विचारपूर केली असता, आरोपी पतीने शौचालयात बंद केलेल्या महिलेला दाखवले. यावेळी महिलेच्या अंगावर काही जखमांच्या निशाण होते. तसेच तिची मानसिक स्थिती बिघडल्याचे निदर्शनास आले.
तथापि, पत्नीची प्रकृती ठीक नाही, अनेक वेळा डॉक्टरांना दाखवूनही ती बरी झाली नाही. वारंवार कपड्यांमध्ये मलविसर्जन करायची, यामुळे तिला शौचालयात बंद ठेवण्यात आल्याचे संबधित महिलेच्या पतीने सांगितले. संबधित महिलेला तीन मुले आहेत. मात्र, त्यांनीही या गोष्टीचा विरोध केला नाही. दरम्यान, पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.