बंगळुरू - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना संकटात सख्खी नातीही परकी होऊ लागली आहेत. आपल्याच आप्तांना कोरोनामुळे दूर लोटलं जात आहे. यात कर्नाटकातील घटना तर कळस गाठणारी ठरली. पत्नी कोरोनाबाधित आढळल्यानंतर पती तिला सोडून पळून गेला आणि इतकेच नाही, तर मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासही आला नाही.
जेसी नगरातील शंकरामठ वॉर्डामध्ये ही घटना घडली. दोघांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांचा संसार व्यवस्थित सुरू होता. शहरातील ओरियन मॉलमध्ये पती कार ड्रायव्हर म्हणून तर पत्नी सेल्स गर्लचे काम करत होती. मात्र, याच दरम्यान पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. हे समजताच तो आपल्या पत्नीला सोडून पळून गेला आणि पत्नीने आपल्याशी संपर्क साधू नये म्हणून त्याने आपला मोबाईल बंद केला.
दरम्यान, महिलेवर कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी तिचा मृत्यू झाला. तिच्या पतीला कोरोनाची लागण असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेने नात्यांमधील पोकळता उघडी पाडली आहे. संबधित महिलेवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना मार्गदर्शक सूचनांनुसार अंत्यसंस्कार केले आहेत.