शिमला - उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या टंचाईचा फटका जसा आपल्याला बसतो, तसाच मुक्या जनावरांनाही त्याचा त्रास सोसावा लागतो. प्राण्यांची हीच अडचण लक्षात घेत, हिमाचल प्रदेशच्या पाटोला साहिब मधील काही तरुणांनी एकत्र येत, एका छोट्या तलावाची निर्मिती केली आहे. जंगली प्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकायला लागू नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाटोला साहिब जिल्ह्याच्या अपर भगानी भागात राहणाऱ्या या तरुणांनी, घनदाट जंगलातील एका लहान तळ्याची स्वच्छता करून त्यामध्ये पाणी भरले आहे. तसेच, शहराच्या पाणी विभागाकडून त्यामध्ये नियमित पाणी भरले जाईल याचीही त्यांनी व्यवस्था केली आहे. यांपैकी एक तरुण मोहम्मद अली याने सांगितले, की प्राण्यांना पाण्यासाठी मानवी वस्तीमध्ये यायला लागू नये, हाही विचार करून आम्ही जंगलातील तळे दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.
देशभरात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे, हिमाचल प्रदेशमध्ये प्रशासनाने केवळ तीन तास घराबाहेर राहण्याची परवानगी दिली आहे. या तीन तासांच्या वेळेतच काही दिवसांमध्ये या तरुणांनी संपूर्ण तळ्याची स्वच्छता केली. यावेळी बोलताना त्यांनी देशातील इतर लोकांनाही प्राण्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
हेही वाचा : लॉकडाऊन इफेक्ट : बाळाला कमरेला बांधून दाम्पत्याने केला मुंबई ते वाशिम पायी प्रवास