नारनौल - भारतीय सैन्यातील एक जवान हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची घटना समोर आली होती. हा जवान एका विदेशी महिलेला भारतीय सैन्याची गुप्त माहिती पुरवत होता. याप्रकरणी जवानाला नारनौल सिटी रेल्वे स्थानकाजवळून अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
रवींद्र कुमार असे हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या जवानाचे नाव आहे. तो ५ कुमाओन रेजिमेंटचा सदस्य होता. त्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून विदेशी महिलेसोबत ओळख झाली होती. विदेशी महिलेने रवींद्रकडून भारताची आणि भारतीय सैन्याच्या विविध विभागाची आणि शस्त्रांची माहिती मागवली होती. माहिती पुरवल्याबद्दल रवींद्रला पैसेही मिळत होते. तो भारतीय सैन्याबद्दलची अतिसंवेदनशील माहिती महिलेला देत होता. याची माहिती मिळताच रवींद्र कुमारला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक विनोद कुमार यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कुमार हा २०१७ साली भारतीय सैन्यात भरती झाला होता. २०१८ साली त्याची विदेशी महिलेसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. रवींद्र कुमार महिलेला संवेदनशील भागातील छायाचित्रे आणि भारतीय सैन्याकडील शस्त्रांचा माहिती पुरवत होता. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.