नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज, रविवारी नागपुरात पार पडला. सरसंघचालक मोहन भागवत यांनी हेडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. मोहन भागवत यांनी 'हिंदुत्व' या शब्दावर बराच काळ चर्चा केली आणि विरोधकांनी याबद्दल संभ्रम पसरवल्याचा आरोप केला.
हिंदू हे कोणत्याही पंथाचे नाव नाही. कोणत्याही प्रांताचा स्वतःचा शब्द नाही, हा कोणत्याही एका जातीचा वारसा नाही, कोणत्याही एका भाषेचा पुरस्कार करणार शब्द नाही. जेव्हा आपण म्हणतो की भारत एक हिंदू राष्ट्र आहे, तेव्हा त्यामागे कोणतीही राजकीय संकल्पना नाही. हिंदूंशिवाय येथे कोणीही राहणार नाही, असे नाही, परंतु या शब्दामध्ये सर्वांचा समावेश आहे, असे मोहन भागवत म्हणाले.
स्व' हे खरंतर हिंदुत्वच -
कोरोनाच्या काळात आपण स्वदेशी शब्दाचा वारंवार प्रयोग केला. या स्वदेशी शब्दातील देशी म्हणजे नीती झाली. मात्र, त्यामधील 'स्व' हे खरंतर हिंदुत्वच आहे. तसेच, 1857 नंतर देशभरात जे विचारमंथन झाले, त्याचा गाभा आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत आहे, ज्याचाच अर्थ हिंदुत्व आहे, असे भागवत म्हणाले.
हिंदू शब्दाच्या अखत्यारीत येण्यासाठी, प्रांत, भाषा इत्यादींचे कोणतेही वैशिष्ट्य सोडले पाहिजे असे नाही. केवळ आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची इच्छा सोडून दिली पाहिजे. यासाठी फक्त फुटीरतावादी भावना स्वतःच्या मनातून काढून टाकावी लागेल. आपल्यात विविधता आहे, असेही ते म्हणाले.
हिंदू शब्द हा केवळ पूजेपुरता मर्यादित नाही -
हिंदू शब्द हा केवळ पूजेपुरता मर्यादित करत, संघावर टीका करणाऱ्यांनी याचा अर्थ संकुचित केला आहे. मात्र, भारत देशातील सर्व 130 कोटी नागरिकांना हिंदू हा शब्द लागू होतो, असे आम्हाला वाटते, असेही मोहन भागवत म्हणाले.