शिमला - 'सात संदूकों में भर कर दफ़्न कर दो नफ़रतें ...आज इंसा को मोहब्बत की ज़रूरत है बहुत' प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांच्या या ओळी पांवटा साहिबच्या ऊपरभगानी गावाकडे पाहून सहज आठवतात. कोरोनाच्या लढाईत ऊपरभगानी गावातील हिंदू आणि मुस्लिम तरुण सोबत मिळून कोरोनाविरुद्ध दोन हात केले आहेत. येथील नवयुवक मंडळाच्या हिंदू आणि मुस्लिमांनी लोकांच्या घराबाहेर लक्ष्मणरेषा आखून त्यांना घरातच राहण्यास विनंती केली आहे.
गावातील एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की आम्ही सर्व नियमांचे पालन करत आहोत. गरज पडल्यास घरातील एकच सदस्य बाहेर पडतो. आम्ही परिवाराशिवाय इतर कोणालाही भेटणे टाळत असल्याचेही सदर व्यक्तीने सांगितले. तसेच आम्हीसुद्धा घरातच राहून सर्व नियम पाळत आहोत. घरातच व्यायाम करण्यासह व्हिडिओ गेम खेळत असल्याचेही एका शालेय मुलाने सांगितले.
आम्ही कोरोनाबाबत घरातील लोकांना माहिती देत आहोत. शेतकऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगत आहोत. नवयुवक मंडळाचे सदस्य शेतकऱ्यांना मदत करत असल्याचेही एका तरुणाने सांगितले. आमच्या जिल्ह्यात पन्नास टक्के कोरोनाला हरवले असून लवकरच आम्ही यावर विजय मिळवू, असे नवयुवक मंडळाचे सदस्य मोहम्मद अली यांनी सांगितले.
गावात जवळपास ८० कुटुंब आहेत. कोरोनाच्या या संकटसमयी हे गाव सर्वांसमोर विविधतेत एकतेचा आदर्श मांडत आहे. हिंदू आणि मुस्लिम परिवारातील लोकांनी नवयुवक मंडळाची स्थापना केली आहे.