ऊना - हुतात्मा जवान अनिल जसवाल यांच्या कुटुंबाच्या ३ पिढ्या अनेक दशकांपासून देशसेवा करत आहेत. अनिल यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे वडील अशोक कुमार हेही लष्करातून सेवानिवृत्त झाले. मुलगा अनिल याला वीरमरण आल्यानंतर त्या दुःखातून सावरत त्यांच्या वडिलांनी 'आता नातूही सैन्यातच जाईल,' असे छातीठोकपणे म्हटले आहे.
हुतात्म्याच्या पित्याच्या डोळ्यात एकाच वेळी मुलगा गेल्याचे दुःख आणि देशसेवा करताना त्याला आलेला मृत्यू याबद्दल अभिमान होता. देशाच्या वीर जवानांसाठी सरकारने अधिकाधिक सुविधा द्याव्यात, असे त्यांनी म्हटले. सरकारने या कुटुंबाला २० लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
सोमवारी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अनिल जसवाल जखमी झाले होते. मंगळवारी लष्करी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी ऊना जिल्ह्यामधील सरोह या त्यांच्या गावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.