शिमला - कोरोना विषाणूने देशात हैदोस माजवला आहे. कोरोनावर नियंत्रणात ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. प्रत्येक राज्य आपापल्या परीने यावर उपाययोजना करत आहेत. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची तपासणी तसेच संशयित आढळल्यास कोरोना चाचणी घेण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी ही माहिती दिली आहे. या अभियानाला १ एप्रिलपासून सुरूवात करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कोरोनाला हिमाचलमधून हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. त्यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकांची तपासणी आणि संशयिताची कोराना चाचणी करण्याची योजना आखली आहे. उद्या म्हणजे १ एप्रिलपासून या अभियानाला सुरूवात करण्यात येणार आहे. 'अॅक्टिव्ह केस फायडिंग' अभियानात आशा वर्कर घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करतील. यासोबत त्या कोरोनाबाबत जनजागृतीही करतील.
दोन आशा वर्करची एक टीम, अशी रचना असणार आहे. यासोबत एक आरोग्य विभागाची टीमही असणार आहे. आशा वर्करची टीम गावातील प्रत्येक घरात जाऊन, घरातील नागरिकाची माहिती घेतील आणि ही माहिती त्या ऑनलाईन पद्धतीने आरोग्य विभागाकडे पाठवतील. यादरम्यान, त्याला जर संशयित आढळला. तर आरोग्य विभागाची टीम त्या संशयिताची कोरोनाची चाचणी घेतील. आशा वर्कर टीम सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत काम करणार आहे.
मुख्यमंत्री ठाकूर यांनी सांगितलं, की 'सद्य परिस्थिती पाहता, या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणारे तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा इतर अत्यावश्यक सेवामध्ये येणारे संदर्भीत विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवेमध्ये एक महिन्याची वाढ करण्यात आली आहे. तसेच हिमाचलमध्ये लक्ष ठेवण्यासाठी राज्य आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.'