शिमला - अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई संदर्भात बेताल वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. सध्या कंगना विरुद्ध शिवसेना असे चित्र आहे. कंगनाच्या कार्यालयातील मुंबई महापालिकेच्या तोडक कारवाईनंतर हिमाचल भाजप सरकारने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र सरकारने सुडाच्या भावनेनं हिमाचलच्या कन्येसोबत गैरव्यव्हार केला. हे अत्यंत चिंताजनक आहे. आमची सरकार आणि देशाची जनता कंगनाच्या पाठीशी उभी आहे, असे हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले.
हिमाचलमधील भाजप अध्यक्ष सुरेश कश्यप यांनी कंगनाचे समर्थन केले आहे. कंगना हिमाचलची कन्या आहे. तीच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. हिमाचलच्या कन्येसोबत जे महाराष्ट्रात झालं. ते संपूर्ण देशानं पाहिलं, असे ते म्हणाले. तसेच भाजपच्या आमदार रीना कश्यप यांनीही शिवसेनेवर टीका केली. 'हिमाचलच्या कन्येचा अपमान आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्र सरकारची कारवाई अत्यंत निंदनीय आहे. काँग्रेसनेही यावर मौन पाळलं आहे', असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईच्या विरोधात कंगनाच्या वकिलाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली. त्यावर महानगरपालिकेने आपली कारवाई थांबवावी, असे आदेश न्यायालयाने बुधवारी दिले होते. यासंदर्भात उत्तर देण्यासाठी पालिकेला गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ दिली होती.