गांधीनगर (गुजरात) - बनासकांठा जिल्ह्यातील एका शिक्षकाने स्वतःची किडनी विकून सावकाराचे कर्ज फेडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या शिक्षकाने कर्ज फेडल्यानंतरही सावकारांनी त्याच्याजवळ पैशाचा तगादा लावल्याने हा प्रकार उघडकीस आला. राजाभाई पुरोहीत, असे त्या शिक्षकाचे नाव आहे.
राजाभाई पुरोहीत हे थराद येथील खोडा प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. पैशांची अडचण असल्याने त्यांनी हर्षद वजीर, देवा रबारी, ओखा रबारी आणि वशराम रबारी यांच्याकडून ३ लाख रुपये एका वर्षासाठी व्याजाने घेतले होते. मात्र, ती रक्कम ते एका वर्षात देऊ न शकल्याने रक्कम दुप्पट झाली. ही दुप्पट रक्कम चुकवण्यासाठी त्यांनी स्वतःची किडनी विकण्याचा निर्णय घेतला होता.
त्यासाठी या शिक्षकाने सोशल मीडियावर किडनी सेलची जाहिरातदेखील केली होती. ही जाहिरात बघून श्रीलंकेतील काही लोकांनी राजाभाई यांच्याशी संपर्क साधला आणि किडनी घेण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. त्यानंतर राजाभाई श्रीलंकेला गेले आणि तेथील एका रुग्णालयात १५ लाखाला किडनी विकली. त्या पैशांनी त्यांनी कर्जाची परतफेड केली. मात्र, त्यानंतरही सावकारांनी त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देणे सुरू ठेवले. अखेर कंटाळून राजाभाई यांनी चार जणांविरोधात थराद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्राथमिक तपासात राजाभाई यांच्या पासपोर्टवर श्रीलंकेत गेल्याची नोंद आहे. याप्रकरणी राजाभाई यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.