बंगळुरु - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. 'मोदी व्यक्तिगत लाभासाठी निवडणूक प्रचारात बालाकोट हवाई हल्ल्याचा वापर करत आहेत. कुमारस्वामी यांनी माजी पंतप्रधान आणि स्वतःचे वडील एच. डी. देवेगौडा हे मोदींपेक्षा अधिक चांगले पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे.
'माझे वडील देवेगौडा चांगले पंतप्रधान होते. ते १० महिने पंतप्रधान पदावर असताना दहशतवादी हल्ला झाला नाही. तसेच, भारत-पाक सीमेवर कोणतीही दहशतवादी घटना घडली नाही. त्याच्या काळात शांतता होती. त्यामुळे ते चांगले नेते आणि प्रशासक आहेत. ते सर्वांत चांगले पंतप्रधान आहेत,' असे कुमारस्वामी म्हणाले. तरीही त्यांनी राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केले आहे. देवेगौडा त्यांचे सल्लागार बनतील, असे ते म्हणाले आहेत.
'अनेक पंतप्रधानांच्या काळात भारत-पाक युद्ध झाले. मात्र, कोणीही त्याचा मोदींसारखा गैरवापर केला नाही. ते या मुद्दयावर लोकांची दिशाभूल करत आहेत. तसेच, काँग्रेससह आघाडी करून सरकार स्थापन करण्याचा आमचा निर्णय योग्यच होतात, हो कर्नाटकच्या जनतेला माहिती आहे,' असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.