मदुराई - तामिळनाडूत गाजत असलेल्या तुतिकोरीनमधील पिता-पुत्राच्या मृत्यूचे प्रकरण सीबीआयकडे देण्याआधीच गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. मद्रास उच्च न्यायालायने घाईघाईने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे तपासासाठी दिले आहे. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुतिकोरीनमधील पिता-पुत्राला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, पोलीस कोठडीतील छळामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांवर आहे. या प्रकरणी राज्यात संतापाची लाट पसरली आहे.
'जोपर्यंत केंद्रीय अन्वेषण विभागाकडे(सीबीआय) तपास पाठवला जाईल तोपर्यंत पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची भीती न्यायालयाने व्यक्त करत तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. त्यामुळे तिरुनवेल्ली येथील गुन्हे शाखेचे उपअधिक्षक अनिल कुमार हे प्रकरण हाताळणार आहेत.
तामिळनाडू सरकारने सोमवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र, त्यास वेळ लागण्याची शक्यता लक्षात घेवून न्यायालयाने प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविले. मदुराई खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. जोपर्यंत सीबीआयकडे तपास सुपूर्द होईल तोपर्यंत पुराव्यांत छेडछाड होण्याची शक्यता आहे, असे न्यायमूर्ती पी. एन प्रकाश आणि बी. पुगलेंधी यांच्या पीठाने म्हटले. जनतेतील आत्मविश्वास कमी होऊ नये म्हणून प्रकरण तत्काळ गुन्हे शाखेकडे पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे न्यायालयाने सांगितले.
काय आहे प्रकरण?
तुतीकोरीनमधील संथलकुलम येथे जयराज आणि त्यांचा मुलगा फिनिक्सने लॉकडाऊनमध्ये ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ मोबाईलचे दुकान उघडे ठेवल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. 23 जूनला दोघांना पोलीस कोठडीत ठेवले. कोठडीत छळ केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी पोलिसांवर ठेवला आहे. पोलीस कोठडीतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी राज्यातील वातावरण पेटले असून पोलीसांच्या छळाविरुद्ध नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. यासंबधी दोन पोलीस उपनिरिक्षकासह चौघांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरांतून होत आहे. या प्रकरणाची तुलना नेटिझन्स अमेरिकेतील जॉर्ड फ्लाईड कृष्णवर्णीय हत्या प्रकरणाशी करत आहेत.