पणजी - गेल्या २००८ मध्ये अंजुणा समुद्र किनाऱ्यावर स्कार्लेट किलींग या ब्रिटीश तरुणाची संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करीत सॅमसन डिसोझासह फ्लासिडो कार्व्हालो यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले होते. आता न्यायालयाने एका आरोपीची निर्दोष मुक्तता करीत सॅमसन डिसोझाला १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली.
गेल्या ११ वर्षांपूर्वी स्कार्लेट गोव्यामध्ये आली होती. त्यानंतर आरोपी डिसोझा याने तिला अमलीपदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर तिला समुद्रकिनारी सोडले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी सॅमसन डिसोझा आणि प्लासिडो कार्व्होला या दोघांना अटक केली होती. पीडिता अल्पवयीन असल्याने त्यावेळी हा खटला गोवा बालन्यायालयात चालला. मात्र, ८ वर्षाच्या लढ्यानंतर आरोपींच्या विरोधात कुठलेही पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने दोघांनाही सोडून दिले होते. मात्र, सीबीआयने न्यायालयाच्या निर्णयाला २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चौहान यांच्या खंडपीठाने या खटल्याची सुनावणी केली. यामध्ये आरोपीला भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाबरोबरच गोवा बालकायद्याअंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये कलम 328 खाली अंमलीपदार्थ देण्यासाठी 10 वर्ष सश्रम कारावास, कलम 354 खाली शारीरिक अत्याचार प्रकरणी 5 वर्ष, कलम 304 खाली मरणाच्या दारात सोडल्यामुळे 10 वर्ष, कलम 201 खाली पुरावे नष्ट केल्यामुळे 2 वर्षे आणि गोवा बाल कायदा कलम 8/2 नुसार असुरक्षित वातावरणात ठेवल्यामुळे 3 वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही सर्व शिक्षा एकत्रित भोगावी लागणार असल्याने ती 10 वर्षे होत असल्याचे स्कार्लेटचे वकील विक्रम वर्मा यांनी सांगितले.
स्कार्लेटच्या शरीरावर होत्या ५० जखमा -
गेल्या २००८ मध्ये स्कार्लेटच्या संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. मात्र, त्यावेळी एपआयआर नोंदवण्यासाठी खूप अडथळे आले. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता स्कार्लेटला अंमलीपदार्थ पाजल्याचे निश्चित झाले. तसेच शरीरावर ५० जखमा आढळून आल्या होत्या. मात्र, हे आरोपी सॅमसनला माहिती असूनही त्याने तपासात सहकार्य केले नाही. बालन्यायालयात ८ वर्ष खटला चालून देखील न्याय मिळाला नाही. यामध्ये सीबीआयचे वकील एजाज खान यांनी पुन्हा रात्रंदिवस मेहनत करून जे पुरावे बालन्यायालयात सादर केले होते. त्याच आधारे गुन्हा सिद्ध झाला असल्याचे अॅड. वर्मा यांनी सांगितले.
न्यायालयाच्या निकालाने स्कार्लेटच्या आईला दिलासा -
उच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने स्कार्लेटची आई फियोना मँक्यू यांना थोडा दिलासा मिळाला असेल हे नक्की. मात्र, हा खटला तब्बल ११ वर्ष चालला. त्यामुळे तिच्या आईला यावे लागत होते. अशाप्रकारे विदेशी नागरिकांना वारंवार खटल्यासाठी येणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा प्रकरणात विदेशी नागरिकांसाठी काहीतरी तरतुद करायला पाहिजे, असे सीबीआयच्यावतीने न्यायालयात लढणारे वकील एजाज खान म्हणाले.