लखनौ : हाथरस प्रकरणाची आज अलाहाबाद उच्च न्यायालायत सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी पीडितेचे कुटुंबीय लखनौला रवाना झाले आहेत. याप्रकरणी न्यायालयाने सरकार आणि पोलिसांनाही समन्स पाठवले आहे, ज्यांच्यावर याप्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
रविवारी रात्रीच या कुटुंबीयांना लखनऊला नेण्याचा विचार होता. मात्र, रात्री जाण्यास कुटुंबीयांनी नकार दर्शवल्यानंतर, आज सकाळी ते रवाना झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आधीच निष्काळजीपणा दाखवला आहे, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या कुटुंबाने रात्री प्रवास करण्यास मनाई केली होती. एसडीएम अंजली गंगवार यांनी सांगितले, की या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही आपल्यासोबत येणार असल्याची माहिती गंगवार यांनी दिली.
पीडितेच्या कुटुंबातील पाच सदस्यांना लखनऊला नेण्यात येत आहे. १४ सप्टेंबरला हाथरसमधील एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर उपचारांदरम्यान २९ सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये याप्रकरणी सुनावणी सुरू आहे.
हेही वाचा : मोदी-शाह बिहार निवडणुकीच्या रिंगणात; भाजपचे स्टार प्रचारक म्हणून निवड