बुलंदशहर - जिल्ह्यातील अनुपशहर पोलीस ठाण्यांतर्गत पनोगा या गावात मंगळवारी पहाटे शिवमंदिराच्या परिसरात दोन साधूंची गळा चिरून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी नशेबाज असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने साधूंची हत्या ही देवाची इच्छा असल्याचे संतापजनक वक्तव्य केले आहे.
या आरोपीने आपणच या दोघांची हत्या केल्याचे कबूल केले आहे. पोलीस चौकशीवेळी आरोपी नशेत होता. चौकशीवेळी जिल्हाधिकारी रवींद्र कुमार आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह स्वतः शहर पोलीस ठाण्यात उपस्थित होते. लॉकडाऊन दरम्यान अशा प्रकारे दोन साधूची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
जागीदास (वय 55) आणि सेवादास (वय साधारण 35) हे दोन साधू मागील 15 वर्षांपासून या शिवमंदिरात राहत होते. हे दोघेही मंदिराचे पौरोहित्य करत असत. गावातील आरोपी राजू याने सोमवारी रात्री उशिरा दोन्ही साधूंची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांच्या मदतीने या आरोपीला पकडण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपी नशेत असल्याचे निदर्शनास आले. त्याने दोन्ही साधूंची हत्या ही 'देवाची इच्छा' असल्याचे संतापजनक वक्तव्य केल्याची माहिती मिळाली आहे.