हरिद्वार - स्ट्रॉबेरी असे फळ आहे, ज्याचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. हरिद्वार येथे मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची उत्पादन होते. मात्र, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी बाजारात घेऊन जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. स्ट्रॉबेरी हे अल्पकाळ टिकणारे फळ आहे. त्यामुळे ते लवकर खराब होते. असे खराब झालेले फळ शेतकरी फेकून देत आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास असा फेकून द्यावा लागत असल्याने शासनाकडून काहीतही मदत मिळावी, अशी मागणी हरिद्वार येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. त्यातून थोडेफार जे उत्पन्न चांगले आहे ते देखील आता लॉकडाऊनमुळे विकता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्ट्रॉबेरी काढली नाही, तर शेतीचेही नुकसान होईल, त्यामुळे शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.
हरिद्वार येथील जिल्हाधिकारी रविशंकर यांनी याबाबत सांगितले, की शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी विकण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. जर कोणाला यामध्ये अडचण निर्माण होत असेल, तर त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी बाजाराचीही सुविधा करण्यात येईल, असे रविशंकर म्हणाले.
हरिद्वार येथे बरेच शेतकरी स्ट्रॉबेरी फळपिक घेतात. जवळपास 8 ते 10 हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. मागच्या वर्षीदेखील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले होते. आता यावर्षी लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागत आहे.