श्रीनगर : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाच्या एका मोठ्या कार्यकर्त्याला अटक करण्यात लष्कराला यश मिळाले आहे. जम्मू आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या एका गावामधून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोहम्मद मुझफ्फर बेग असे या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात असणाऱ्या हांदवाडा भागातील रहिवासी होता. शुक्रवारी रात्री उशीरा त्याला अटक करण्यात आले. त्याला चाकरोई गावातून ताब्यात घेण्यात आले. यासोबतच ज्या घरातून मोहम्मदला अटक करण्यात आली, त्याच्या घरमालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ मार्चला बेग या घरात राहण्यास आला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांमध्येच लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्याला तिथून पळ काढता आला नाही.
या दहशतवाद्याकडून काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यांमुळेच त्याचे आणि जैशचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. मोहम्मदकडून आणखीही बऱ्याच दहशतवाद्यांची माहिती मिळू शकते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी रुमालाचा मास्क म्हणून केला वापर...