नवी दिल्ली - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी कुमारस्वामी यांनी चांद्रयान-२ मिशनमध्ये अडथळा आल्याच्या घटनेवरुन मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी चांद्रयान २ चे लँडींग पाहण्यासाठी बंगळुरला गेले होते. मात्र, मोदींचे तेथे जाणे इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी अपशकूनी ठरले, असे कुमारस्वामी म्हणाले.
'जसं काय मोदीच चांद्रयान २ चे लँडिग करणार होते, आणि चंद्रावर संदेश पाठवणार होते, असा टोलाही त्यांनी लगावला. मोदींचे इस्रोच्या नियंत्रण कक्षात जाणे शास्त्रज्ञांना अपशकून ठरला. शास्त्रज्ञांनी यासाठी दहा वर्ष कष्ट केले. २००८ सालीच मंत्रीमंडळाने चांद्रयान २ मोहिमेला मंजूरी दिली होती, मात्र, मोदी तेथे गेल्यामुळे अपशकून घडला, असे कुमारस्वामी म्हणाले.
चंद्रापासून अवघे २ किमी अंतर दूर असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यामुळे चांद्रयान २ मोहिमध्ये अडथळा आला. इस्त्रोचे वैज्ञानिक विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याला अद्याप यश आले नाही. चांद्रयान २ चे लँडीग पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगळुरुला गेले होते. इस्त्रोच्या नियंत्रण कक्षामध्ये मोदींनी शास्त्रज्ञांशी संवाद साधला होता. तसेच मोहिमेत अडथळा आल्यानंतर त्यांनी वैज्ञानिकांचे मनोबल वाढवले होते. मात्र, एच. डी कुमारस्वामी यांनी मोदींच्या इस्रोमधील उपस्थितीवरून टीका केली आहे.