गांधीनगर - मासिक पाळी सुरू नसल्याचे सिद्ध करण्यासाठी तब्बल ६८ विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमधील भूज जिल्ह्यामध्ये घडला आहे. 'श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूट'मध्ये हा प्रकार घडला.
महाविद्यालयांमध्ये मासिक पाळी सुरु असलेल्या विद्यार्थिनींसाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे काही विद्यार्थिनी उल्लंघन करत असल्याचे आढळून आल्याने प्रशासनाने मुलीना अंतर्वस्त्रे काढायला लावली, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी विद्यार्थिनींनी आंदोलन पुकारले आहे. महाविद्यालय प्रशासनावर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. आम्ही आमच्या महाविद्यालयाचा आदर करतो. मात्र, त्यांनी जे आमच्यासोबत केले ते चुकीचे आहे. आमच्या बरोबर घडलेल्या प्रकाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही माध्यम प्रतिनिधींना बोलवणार आहोत, असे एका विद्यार्थिनीने सांगितले.
तक्रार मागे घेण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला धमकी दिल्याचा आरोप काही विद्यार्थिनींनी केला आहे. विद्यालयात सर्व काही ठीक असल्याचे लेखी द्यावे, अशी मागणी प्रशासनाने केल्याचेही काही विद्यार्थिनींनी सांगितले.
'ही घटना वसतिगृहात घडली असून याचा महाविद्यालय किंवा विद्यापीठाशी काहीही संबध नाही. कोणत्याही मुलीला नियम पाळण्यास सक्ती करण्यात आली नव्हती. मुलींच्या परवानगीनेच ही तपासणी करण्यात आली. एकाही मुलीला हात लावण्यात आला नाही. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे,' असे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता दर्शना ढोलकिया यांनी सांगितले.