सुरत - देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनामुळे देशामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुजरातमधील सुरत येथील विलगीकरण कक्षातून पळून गेलेला 50 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण मृत अवस्थेमध्ये आढळला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोरोनाबाधित रुग्ण 28 एप्रिलला रात्री वार्डामधून बाहेर पडला. त्यानंतर पोलीसांनी शक्य त्या ठिकाणी रुग्णाचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यावर रुग्णालयातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करण्यात आला. तेव्हा तो रुग्णालय परिसराच्या बाहेर न गेल्याचे आढळले. संपूर्ण रुग्णालय परिसर तपासला असता, वैद्यकीय कक्षाबाहेरील बेंचवर रुग्ण मृत अवस्थेमध्ये आढळला आहे.
मृत व्यक्ती ही सलबतपूरा येथील रहिवासी असून 21 एप्रिलला रुग्णालयात दाखल झाली होती. त्याची पत्नीही कोरोनाबाधित रुग्ण असून दोघांवरही एकाच रुग्णालयात उपचार सुरु होते.
दरम्यान, कोरोना संशयित रुग्णालयातून पळाले, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, या सारख्या अनेक घटना घडल्याचे संपूर्ण देशातून पुढे येत आहे. यातून कोरोनाबाबत जनजागृती होत असताना देखील देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.