नवी दिल्ली - एखादी व्यक्ती कोरोना संशयित आढळल्यास त्यांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागते. यातील काही संशयित व्यक्ती ज्यांना घरात क्वारंटाईन करण्यात आले आहे. ते या नियमांचे पालन न करता घरातून बाहेर पडताहेत. त्यामुळे यावर दिल्ली सरकारने एक उपाययोजना केली आहे. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले 'ज्या व्यक्ती संशयित असून त्यांना होम क्वारंटाईन केल आहे, त्या व्यक्तींचे फोन ट्रेस करण्यात येणार आहेत. जेणेकरून ते घरातच आहेत कि कुठे बाहेर जाऊन आले याबाबत माहिती मिळू शकेल. हा निर्णय एलजी आणि आपण घेतला असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. हा प्रयोग काही देशांनी याआधी केलेला आहे', अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
२५ हजाराहुन जास्त नंबर होणार ट्रेस
केजरीवाल म्हणाले, काल (बुधवार) पोलिसांना ११ हजार ८४ जणांच्या फोनची यादी देण्यात आली आहे. ज्यांना ते ट्रेस करतील. तर, आज आणखी १४ हजार ३४५ जणांच्या फोन क्रमांकाची यादी देण्यात येईल. ते या क्रमांकाद्वारे त्या व्यक्ती घराबाहेर कुठे बाहेर पडल्या आहेत याची पडताळणी करतील. यातील सर्वजण जे क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यांना सरकारने घरून बाहेर न पडण्याचे आणि इतरांच्या संपर्कात न येणाच्या आदेश दिले होते. मात्र, यातील काहीजण या आदेशाचे उल्लंघन करून घराबाहेर पडताहेत. आणि त्यांच्यामुळे परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
यासोबतच, एखादा नंबर ट्रेस केल्यानंतर ती व्यक्ती घराबाहेर पडली आहे असे अहवालात आल्यास त्या वक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. तसेच, त्या व्यक्तीच्या संपर्कात कोण आणि किती लोक आले याबाबतची रिपोर्टदेखील तयार करण्यात येईल, असे केजरीवाल म्हणाले.