नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूविरोधात लढण्यासाठी भारतीय-अमेरिकन वंशाचे 'गुगल' आणि 'अल्फाबेट' या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी तब्बल 800 दशलक्ष डॉलर्स ( जवळपास 5900 कोटी रुपये) एवढी आर्थिक मदत केली आहे. जगभरातील लघु व मध्यम व्यवसाय, आरोग्य संस्था आणि सरकारी संस्था आणि आरोग्य कर्मचारी यांना ही मदत देण्यात आली आहे. पिचाई यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.
गेल्या वर्षभरापासून सक्रिय खाते असलेल्या जगभरातील लघु व मध्यम व्यवसायांना गुगल अॅड क्रेडिटच्या रूपात 340 दशलक्ष डॉलर्स मिळतील. जागतिक आरोग्य संघटना 100 हून अधिक सरकारी संस्थांना 250 दशलक्ष डॉलर्स देण्यात येतील. स्वयंसेवी संस्था आणि बँकासाठी 200 दशलक्ष डॉलर्स देण्यात येतील. जेणेकरून लघु उद्योगांसाठी आर्थीक व्यवस्थापन करता येईल, असे सुंदर पिचाई यांनी सांगितले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार जगातील 180 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसार झाला आहे. युरोपीत इटली आणि स्पेनमध्ये कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. जगभरातील इतरही खंडामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. आत्तापर्यंत सुमारे सहा लाख नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर 27 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक देशांनी शहरेच्या शहरे बंद ठेवली असून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि प्रवास ठप्प झाला आहे