चेन्नई - तामिळानडूच्या तिरूचिरपल्ली गावातील एक मंदिरात तब्बल ५०५ सोन्याच्या नाण्यांनी भरलेला घडा सापडला आहे. या नाण्यांचे एकूण वजन १.७१६ किलो असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जांबुकेश्वर मंदिरात खोदकाम सुरू असताना बुधवारी हा घडा सापडला.
मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये सोन्याची ५०४ लहान, तर एक मोठे नाणे आहे. या नाण्यांवर अरेबिक लिपीमधील अक्षरे छापण्यात आली आहेत. या अक्षरांवरून ही नाणी साधारणपणे १००० ते १२०० वर्षांपूर्वीची असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की हा घडा जमीनीखाली सात फूट खोलीवर आढळून आला. हिंदू धार्मिक आणि धर्मादाय संस्थेच्या संपत्ती विभागाने हा घडा आणि सोन्याची नाणी पोलिसांच्या स्वाधीन केली. ती सध्या कोषागरात ठेवण्यात आली असून, त्याबाबत अधिक संशोधन सुरू आहे.
हेही वाचा : आंतरराष्ट्रीय शिवरात्री महोत्सवात शेणापासून बनलेल्या चपलांचा समावेश...