पणजी - गोवा विधानसभेचे कामकाज आजही तासभरासाठी तहकूब करण्यात आले होते. विरोधी पक्षातील आमदार रोहन खंवटे यांच्या अटकेचा निषेध करत त्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. या मागणीनंतर सभागृहात गोंधळ झाल्याने सभापती राजेश पाटणेकर यांनी सभागृह कामकाज एक तासासाठी स्थगित केले.
अपक्ष आमदार खंवटे यांना बुधवारी मध्यरात्री अटक करून पहाटे जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. त्याचा निषेध करत त्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षातील आमदारांनी केली होती. तसेच दंडावर काळ्या फितीबांधून सभागृहात आले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज गुरुवारी चार वेळा स्थगित करण्यात आले होते.
आज(शुक्रवारी) पुन्हा विरोधी पक्षाच्या आमदारांनी दंडावर काळ्याफिती बांधून सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर साडेअकरा वाजता सभापतींनी कामकाजाला सुरुवात करताच विरोधी पक्षातील आमदारांनी खंवटे यांना का अटक करण्यात आली? अशी विचारणा केली. तर खंवटे यांनी सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली. याच गोंधळात सभापतींनी प्रश्नोत्तराच्या तासाने कामकाजाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. परंतु, विरोधक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने सभापतींनी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले.
का केली होती अटक ?
गोव्याचे माजी महसूल मंत्री आणि पर्वरी मतदारसंघाचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना बुधवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी अटक केली होती . भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांना धमकी दिल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी खंवटे यांना अटक करून पहाटे जामिनावर त्यांची सुटका केली. या प्रकणावरून विधानसभेत गदारोळ सुरू आहे.