पणजी (गोवा) - मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि टॅक्सी मालक संघटनांची आज विधानसभेत बैठक पार पडली. यामध्ये मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या टॅक्सीसेवा संदर्भातील वादावर बुधवारी (दि.३१) विधानसभेत चर्चा होण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे हा वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
या बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांच्यासह विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो, काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव आणि सर्वप्रकारच्या टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली.
बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, आज टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली आहे. यावर बुधवारी सभागृहात चर्चा होणार आहे. 'गोवा माईल्स' आणि टॅक्सी संघटनांकडून आलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
या विषयावर मंत्री लोबो म्हणाले की, या वादावर मुख्यमंत्र्यांना चांगला पर्याय सूचवला आहे. गोमंतकीय टॅक्सी चालकांच्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये समन्वय नसल्याने 'गोवा माईल्स' चे फावले आणि हा गोंधळ निर्माण झाला. या व्यवसायात पारदर्शकता यायला हवी, प्रवाशाला समाधान वाटले पाहिजे. त्यामुळे हळूच मागच्या मार्गाने आलेले आपोआपच बाहेर निघेल. तसेच बुधवारी या विषयावर चर्चा होणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
लोबो यांच्या वक्तव्याला समर्थन देत चर्चिल आलेमाव यांनी आजच्या बैठकीतील चर्चेचा विषय सभागृहात मांडला जाणार असून यावर टॅक्सीधारक सहमत झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
.......अन्यथा आम्ही गप्प राहणार नाही
आजच्या बैठकीत चांगली चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री आमच्या सोबत असून परवा या विषयावर सभागृहात चर्चा घडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे मंगळावरी (दि.३०) संघटनेच्यावतीने केल्या जाणाऱ्या निदर्शनास स्थगिती देण्यात आली आहे. तसेच टॅक्सी चालकांनी काही काळ धीर धरावा. मात्र, विधानसभेतील चर्चेत 'गोवा माईल्स' रद्द झाले नाही तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा उत्तर गोवा टुरिस्ट टॅक्सी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चेतन कामत यांनी दिला आहे.
तर याबाबत टुरिस्ट टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष वासुदेव आर्लेकर म्हणाले की, आज (सोमवारी) मुख्यमंत्र्यांनी आमच्यासोबत केलेल्या चर्चेतून निर्णय आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास वाटतो आहे. सभागृहात 'गोवा माईल्स' ठेवावे की नाही, याविषयी चर्चा होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, 'गोवा माईल्स' अॅपबेस्ड टॅक्सीसेवा रद्द करावी या मागणीसाठी पारंपरिक टॅक्सी सेवा देणाऱ्या टॅक्सी संघटना मागील काही महिने सातत्याने सरकारकडे आपले म्हणणे मांडत आहेत. विधानसभेतील चर्चेत यावर तोडगा निघेल, अशी सरकार आणि टॅक्सी संघटना या दोघांनाही आशा आहे.