पणजी - गोव्यामध्ये नौदलाच्या अॅडव्हॉन्सड लाईट हेलिकॉप्टरद्वारे समुद्र किनाऱ्यावरील दुर्गम भागातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. केप रामा या भागात शुक्रवारी हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य राबविण्यात आले. या ठिकाणी कोणतेही वाहन जाण्यास रस्ता नव्हता तसेच हा भाग खडकाळ असल्याने हेलिकॉप्टरद्वारे मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला.
डबोलिन विमानतळापासून सुमारे 35 कि.मी लांब अगोंदा खाडी भागात एक व्यक्ती मासे पकडण्यास गेला असता 19 जुलैला त्याचा बुडून मृत्यू झाला होता. मात्र, पोलिसांना मृतदेह सापडत नव्हता. त्यामुळे नौदलाच्या हेलिकॉप्टरने मृतदेहाचे निश्चित ठिकाण शोधण्यात आले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तेथे पोहचून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर रोपच्या सहाय्याने मृतदेह हेलिकॉप्टरला बांधून बाहेर काढण्यात आला.
नौदलाने नंतर मृतदेह स्थानिक प्रशासनाच्या हाती सोपवला. नौदलाच्या हंस हवाई तळावरील नियंत्रण कक्षाने स्थानिक नागरिक आणि शोधकार्य करणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये संवाद साधण्याचे काम केले.