नवी दिल्ली - गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिल्ली हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला आहे. शनिवारी शहरातील एका कार्यक्रमाला मलिक यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी सीएए कायद्याचे समर्थन केले.
पाकिस्तानच्या इशाऱ्यावर देशामध्ये दंगली घडवल्या जात आहेत. पोलीस आपले कार्य करत असून पाकिस्ताच्या नापाक कारवायांना यश मिळणार नाही. तसेच सीएएबद्दल विरोधक अफवा पसरवत आहेत. नागरिकांनी अशा अफवावर लक्ष देऊ नये. देशामध्ये शांती कायम ठेवण्यासाठी अफवाकडे दुर्लक्ष करायला हवे. सीएए कायद्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही. तर शरणार्थींना या कायद्यामुळे नागरिकत्व मिळणार आहे, असे सत्यपाल मलिक म्हणाले.
सत्यपाल मलिक यांची ऑक्टोंबरमध्ये जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदावरून गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. सत्यपाल मलिक हे आपल्या बेधडक वक्तव्यावरून ओळखले जातात. देशातील राज्यपालपदाची स्थिती दुर्बल व्यक्तीसारखी असते. ही व्यक्ती पत्रकार परिषद आयोजित करू शकत नाही अथवा स्वत:च्या हृदयातील भावना व्यक्त करू शकत नाही, असे वक्तव्य त्यांनी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी असताना केले होते.