पणजी - सत्ता प्राप्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह कोणत्याही थराला जाऊ शकतात, असे म्हणत काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार यांनी पुलवामा हल्ला घडवून आणला नसेल कशावरून अशी शंका व्यक्त केली होती. त्याचा समाचार घेताना भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी निषेध करत काँग्रेस पाकिस्तानी राग आळवून दहशतवाद्यांना 'क्लिन चीट' देऊ इच्छित आहे काय? असा सवाल केला.
गोव्यात भाजपने खाण विषयावर लोकांची कशाप्रकारे दिशाभूल करत सत्ता मिळवून लोकांवर उपासमारीची वेळ आणली हे सांगण्यासाठी काँग्रेसने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. केंद्र सरकार सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. महालेखापाल अहवालाखडे दूर्लक्ष केले. त्यामुळे सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते, असे ते म्हणाले. काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत बोलताना एका प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. चेल्लाकुमार म्हणाले होते की, एका भाजपच्या एका कार्यकर्त्याने (नाव न सांगता) अलिकडेच म्हटले होते की, गोध्रा प्रकरण हे भाजपने घडवून आणले होते. मग पुलवामा हल्ला घडवून आणला नसेल का अशी शंका येते. कराण यामधील शहिदांचे मृतदेह सापडले आहेत. परंतु, दहशतवाद्याचा मृतदेह सापडलेला नाही.
या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा, चेल्लाकुमार यांच्या वक्तव्याचा निषेध करत शर्मा म्हणाल्या की, हे अनपेक्षित आहे. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश- ए- महंमद या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. शिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याविषयावर राजकारण करणार नाही, असे म्हटले होते. असे असतानाही गोवा काँग्रेस प्रभारी पुरावा मागत आहेत. हे एकदम असंवेदनशील आणि खालच्या पातळीवरील राजकारण करत आहेत. त्याचा भाजप तीव्र निषेध करत आहे.
काँग्रेस वारंवार पाकिस्तानचे गाणे का गात आहे? त्यांची बाजू का घेत आहे हे सांगावे. पुरावा मागुन ते दहशतवाद्यांना ' क्लीन चीट' देऊ इच्छित आहे का? यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.