पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे डॉक्टर सावंत सध्या घरातच विलगीकरणात राहिले आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी स्वत: ट्विटवरून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
ते म्हणाले, की माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य लक्षणे दिसत असल्याने घरी विलगीकरणात आहे. घरी राहून मी काम सुरू ठेवणार आहे. जे माझ्या जवळून संपर्कात आले आहेत, त्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा माझा सल्ला आहे.
तब्बल ७८ हजार ३५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद देशात नोंद
गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ७८ हजार ३५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसात नोंदवली गेलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्याही ३७ लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली. यासोबतच, मंगळवारी दिवसभरात एकूण १,०४५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ६६ हजार ३३३ झाली आहे. आतापर्यंत देशभरात ३७ लाख ६९ हजार ५२४ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी ८ लाख १ हजार २८२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत २९ लाख १ हजार ९०९ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.