शिमला- वातावरण बदलामुळे भविष्यात भारतापुढे गंभीर संकट उभे राहणार आहे, याची चिन्हे दिसायला लागली आहेत. हिमालय पर्वत रांगामधील हिमनद्या वातावरण बदलामुळे वितळत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशामधील डोंगर रांगामधल्या तलावांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

विज्ञान, पर्यावरण आणि प्रोद्यौगिक परिषदेने केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिमनद्या वितळल्यामुळे सतलज, चिनाब नद्यांच्या खोऱ्यातील तलावांमधील पाण्यात १५ टक्के वाढले आहे. तर रावी नदीच्या खोऱ्यातील तलावांमध्ये १२ टक्के पाणी वाढ झाली आहे. तलावांमध्ये वाढणाऱ्या पाण्यामुळे भविष्यात नद्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हिमाचलसहित बाजूबाजूच्या राज्यांनाही त्याची झळ बसण्याची शक्यता आहे.
सतलज, रावी आणि चिनाब नद्यांवरील तलावात पाणी वाढत असल्याने नैसर्गिक आपत्तीचे संकट पुन्हा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तलावांचा आकार वाढतच आहे. या अवहालाबाबत राज्य सरकारलाही सूचित करण्यात आले आहे. येत्या पावसाळ्यात यावर उपाययोजना करण्याचे सरकारला सांगण्यात आले आहे.
२००५ साली तिबेटमधील पारछू तलावात वाढलेल्या पाण्यामुळे हिमाचल प्रदेशात आपत्ती ओढावली होती. त्यावेळी ८०० कोटींचे नुकसान झाले होते. त्यामुळे भविष्यात या नद्यांच्या तलावातील वाढते पाणीही धोक्याची घंटा आहे.