नवी दिल्ली - हरियाणातील मुलींना पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी प्रमाणपत्रासह पासपोर्टही दिले जाणार आहे. यासंबधित संपूर्ण प्रक्रिया महाविद्यालयातच होईल. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शनिवारी आयोजित ‘हर सर हेल्मेट’ या कार्यक्रमात ही घोषणा केली. सर्व विद्यार्थींनींना पदवीसह पासपोर्ट मिळावेत, असा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
हर सर हेल्मेट' कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी 100 विद्यार्थ्यांना लर्निंग ड्राईव्हिंग लायसन्स आणि मोफत हेल्मेट दिले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 1 हजार विद्यार्थ्यांना परवाने देण्यात येतील जेणेकरुन त्यांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरवर्षी देशात मोठ्या संख्येने रस्ते अपघात होतात. दररोज 1 हजार 300 अपघात होत असल्याची नोंद आहे. ज्यामध्ये बहुतेक लोक हेल्मेट न घातल्यामुळे मरण पावले आहेत. हरियाणामध्ये वर्षाअखेर जवळपास साडेचार हजार रस्ते अपघात होतात आणि त्यामध्ये दररोज सरासरी 13 जणांचा अकाली मृत्यू होतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.