तिरुअनंतपुरम - येथील विक्रम साराभाई अंतराळ संधोधन केंद्रातील अॅरोस्पेस प्रॉडक्टच्या निर्मीतीसाठी लागणारी भारी भक्कम ऑटोक्लेव्ह मशीन ही रविवारी महाराष्ट्रातील नाशिकहून तिरुअनंतपुरम येथे एका विशेष ट्रकद्वारे पोहोचली आहे. एरोस्पेस हॉरीझोन्टल ऑटोक्लेव्ह असे या विशाल मशीनचे नाव आहे. या मशीनला ७४ टायरच्या विशेष ट्रकने महाराष्ट्रातून केरळपर्यंत आणण्याकरता तब्बल १२ महिन्यांचा कालावधी लागला आहे.
७८ टन वजनी असलेल्या भारीभक्कम अशा एरोस्पेस ऑटोक्लेव्ह मशीनला घेऊन हा ट्रक नाशिकहून ८ जुलै २०१९ रोजी निघाला होता. तब्बल चार राज्यातून १२ महिन्यांचा प्रवास करत हा ट्रक रविवारी तिरुअनंतपुरम येथे पोहोचला. या ट्रकमध्ये असलेल्या ऑटोक्लेव्ह मशीनची उंची ७.५ मीटर तर, रुंदी ७ मीटर आहे. या सोबतच, मशीनच्या देखरेखीकरता ट्रकबरोबर जवळपास ३२ इंजिनीयर आणि मॅकेनिक्सची टीम सोबत होती, असे येथील एका स्टाफ मेंबरने सांगितले.
या विशाल मशीनच्या भागांना वेगळे करता येत नसल्याचे विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तर, तब्बल १२ महिन्यांचा प्रवास करत ही बलाढ्य मशीन अखेर तिरुअनंतपुरमपर्यंत पोहोचली आहे. या ऑटोक्लेव्ह मशीनचा उपयोग एरोस्पेचच्या विविध प्रॉडक्ट्सच्या निर्मितीकरता करता येणार आहे.