नवी दिल्ली - भाजपमध्ये दाखल झालेला माजी क्रिकेटर गौतम गंभीरला भाजपने पूर्व दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेच त्याने आपल्या नावासमोर 'चौकीदार' असे लिहले आहे. याद्वारे त्याने पंतप्रधान मोदींच्या 'मैं भी चौकीदार' या मोहिमेशी स्वत:ला जोडून घेतले.
जवळपास एक महिन्यापूर्वी गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळीपासूनच त्याला भाजपकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते.
काल (मंगळवार) गौतम गंभीरने पूर्व दिल्लीतून उमेदवार अर्ज भरला. यानंतर त्याने ट्वीट करून, 'पूर्व दिल्ली लोकसभेचे सर्व कार्यकर्ते, नेते आणि तरुण साथीदारांचे मनापासून आभार! माझा नवा प्रवास संस्मरणीय बनवण्यासाठी मनापासून आभार. रोड शोमुळे माझ्या चाहत्या वर्गाला आणि रहदारीला गैरसोय झाली. यासाठी मी क्षमा मागतो,' असे म्हटले आहे. गौतम गंभीर नेहमीच देशाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सोशल मीडियावर स्वतःचे मत व्यक्त करत असतो.
पूर्व दिल्लीतील जागेसाठी कोणाचे नाव येईल, याची होती उत्सुकता
पूर्व दिल्लीच्या लोकसभेच्या जागासाठी कोणाला निवडण्यात येईल, यासाठी मोठी उत्सुकता होती. निवडणुकीपूर्वीची ही लढत रंगतदार झाली. या जागेसाठी भाजपकडून गौतम गंभीर मैदानात आहे तर, काँग्रेसने दिग्गज नेते अमरिंदर सिंह लवली यांना तिकिट दिले आहे. आम आदमी पक्षाने येथून आतिशी यांना तिकिट दिले आहे. १२ मे रोजी दिल्लीत मतदान होणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होईल.