लखनऊ - गाजियाबाद येथील एका वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ते पोलीस आणि प्रशासनाकडे मदत मागत आहेत. आपला मुलगा आणि सुनेला घराबाहेर काढावे, यासाठी त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर याबाबत मार्ग काढण्यात आला आहे.
व्हिडिओतील इंद्रजित ग्रोवर आणि पुंष्पा ग्रोवर हे दाम्पत्य गाजियाबाद येथील डीएलएफ अंकुर विहार येथे राहतात. मुलगा आणि सुनेला घराबाहेर काढण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र, मुलगा आणि सुन त्यांना त्रास देतात, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देतात त्यामुळे आमची मदत करा,अशी विनंती त्यांनी व्हिडिओत केली होती.
वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ व्हायरल होत होत पोलीस आणि प्रशासनापर्यंत पोहोचला. पोलिसांनी हे प्रकरण आमच्याशी नाही तर ते प्रशासनाशी संबधित आहे, असे सांगितले. यानंतर, गाजियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली.
जिल्हाधिकारी रितु महेश्वरी यांनी ट्विट करून या वादावर पडदा पडला आहे, असे सांगितले. मुलगा आणि सुन यांनी 10 दिवसात घर सोडणार आहे, असे लिहून दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ग्रोवर दाम्पत्याने मुलगा आणि सुनेला त्यांच्या संपत्तीतून नोव्हेंबर महिन्यात बेदखल केले होते.