रांची - 'इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते', सुरेश भटांनी या कवितेतून मरणही सुसह्य असल्याचे सांगितले असले तरी कोरोनाने मृत्यू झालेल्यांना मात्र मृत्यूनंतरही मरणयातना भोगण्याची वेळ आली आहे. रांचीमध्ये, कोरोनाबाधित वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर 18 तासांनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रांचीमध्ये एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृतदेह दफन करण्यासाठी दफनभूमीत जागा नसल्याच्या कारणावरून दिवसभर तमाशा सुरु होता. त्यामुळे संपूर्ण एक दिवस मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये ठेवण्यात आला होता. त्यानंतर बरियातू येथील दफनभूमीत जागा निश्चित करुन दफन करण्याची तयारी सुरु होती. मात्र, येथे जागा छोटी असल्याच्या कारणावरुन रातू रोडवरील दफनभूमीत दफन करण्याचे ठरवले. मात्र, तेथील स्थानिकांनी त्या ठिकणी मृतदेहाचे दफन करण्यासाठी विरोध केला. त्यामुळे दिवसभर मृतदेह या दफनभूमीतून त्या दफनभूमीकडे जात होता. शेवटी काही हिंदपीढीतील लोक पुढे आले आणि मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे दफन केले.
रातू रोडनंतर पोलीस प्रशासनाने मुस्लिम समाजातील विचारवंत व मान्यवरांशी सातत्याने संवाद साधल्यानंतर डोरांडा स्मशानभूमीत मृतदेहाचे दफन करण्याची योजना आखली. त्यानंतर तेथे सायंकाळी उशिरा मृतदेहाचे दफन करण्यात आले. मृताचे चार नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी होते. नातेवाईकांना अंत्यसंस्कारामध्ये सामील होण्यासाठी पीपीई किट देण्यात आले होते.