नवी दिल्ली - देशभरात खाद्य तेलातील भेसळ ओळखण्याासाठी अन्न सुरक्षा नियामक विभागाने दोन दिवसीय सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून तेलातील भेसळ शोधून काढण्यात येणार आहेत. एफएसएसआयने देशभरातून तेलाचे ४ हजार ५०० नमुने गोळा केले आहेत. १६ विविध प्रकारच्या तेलांचे हे नमुने अन्न सुरक्षा विभागाकडून तपासण्यात येणार आहेत. मोहरी, खोबरेल तेल, पाम, ऑलिव्ह यांच्यासह इतर तेलाचे नमुने जमा करण्यात आले आहेत.
किराणा दुकान, सुपर मार्केटमधून घेतले तेलाचे नमुने
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. लडाख, अरुणाचल प्रदेश, दिव दमन, अंदमानसह विविध डोंगराळ आणि दुर्गम भागातूनही तेलाचे नमुने जमा करण्यात आले आहेत. सुपर मार्केटसह विविध किराणा दुकानांतून नमुने घेण्यात आले आहेत. तेलाच्या विविध नामांकित कंपन्यांसह स्थानिक कंपन्यांच्या तेलाचे नमुन्यांचा यात समावेश आहे.
दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, चेन्नई आणि कोलकाता सारख्या मेट्रो शहरातून ५० पेक्षा जास्त तेलाचे नमुने जमा करण्यात आले आहेत. राज्य अन्न सुरक्षा विभागाने हे नमुने जमा केले आहेत. नमुने जमा करण्यासाठी काटेकोर नियम आणि अटी एफएसएसआयने घालून दिल्या होत्या. त्यानुसार पुढील सर्वेक्षण करण्यात येत आहे.
महिन्याभरात पूर्ण होणार अभ्यास
तेलाचे नमुने तपासण्यासाठी केंद्रीय अन्न सुरक्षा विभागाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. विविध राज्यातील प्रयोगशाळांतून हे नमुने तपासण्यात येणार आहेत. तेलात इतर कोणती भेसळ आहे का? फॅटी अॅसिडच्या प्रमाणासह विविध मानके तपासण्यात येणार आहेत.