चेन्नई - कांद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे सध्या देशभरात नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच, तामिळनाडूच्या कडलोर शहरातील एका संगणक विक्रेत्याने ग्राहकांना बंपर ऑफर दिली आहे. 'तमिळ कम्प्युटर्स' असे नाव असलेल्या या दुकानातून एक संगणक खरेदी केल्यास, ग्राहकांना तब्बल दीड किलो कांदा मोफत मिळणार आहे.
कांदा कापताना डोळ्यात पाणी येते हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, सध्या देशात अशी परस्थिती आहे, की कांद्याच्या किंमती ऐकूनच लोकांना रडू येत आहे. देशभरातील कित्येक हॉटेलांमधून कांदा हद्दपार झाला आहे. नामांकित हॉटेल्स एकतर कांदा असणाऱ्या डिशेस उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत किंवा मग जास्त किंमतीला त्या विकत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तर चक्क चोरट्यांनी एका दुकानातून कांदे चोरी केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, यावेळी चोरांनी दुकानातील पैशाच्या पेटीला हातदेखील लावला नाही.
या पार्श्वभूमीवर, तमिळ कम्प्युटर्सने दिलेली ही ऑफर लोकांना चांगलीच पसंत पडली आहे. 'वैज्ञानिकांसाठी मोफत कांदा' अशा टॅगलाईनमुळे बरेच लोक या दुकानाकडे आकर्षित होत आहेत.
हेही वाचा : टाकाऊ प्लास्टिक द्या अन् अंडी, मिठाई घेऊन जा, आंध्रमधील महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम