बंगळुरु - कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये मंगळवारी रात्री हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात 2 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 60 पोलीसही जखमी झाले आहेत. याप्रकरणी चौकशीसाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
सोशल मीडियावरील भावना भडकावणाऱ्या कथित पोस्टनंतर मंगळवारी रात्री सुरू झालेला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीचा प्रकार बुधवारी पहाटेपर्यंत सुरू होता. मूर्ती यांचे निवासस्थान आणि डीजे हळ्ळी पोलीस ठाण्याची जमावाने तोडफोड केली. मूर्ती यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. दरम्यान, काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचा भाचा नवीनला संबंधित पोस्टप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
फॉरेन्सिक्स टीमने डीजे हळ्ळी पोलीस ठाणे व केजी हल्ली पोलीस ठाण्याच्या आवारात तपासणी केली. दरम्यान, या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचं झालेल्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून वसूल करण्यात येईल, असं गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.