भोपाळ - बालाघाटातील बेहरमार्गावर असलेल्या गांगुलपरा दरीमध्ये एक ट्रक उलटून अपघात झाला. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला तर आठजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील दोघांना पुढील उपचारांसाठी नागपूर शासकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे.
अपघातात चौघांचा मृत्यू -
एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चरोटा भाजी आणि झाडूने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात दुचाकीस्वारासह चार आदिवासींचा मृत्यू झाला. पायली गावाचे रहिवासी असणारे हे झाडू कारागीर कच्चा माल घेऊन परत येत होते. अपघातात आठ जण जखमी झाले, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल -
या अपघाताची माहिती मिळताच, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी वाटसरूंच्या मदतीने जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवले.
राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख -
ट्रक अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती राज्याचे आरोग्य व जलसंधारण मंत्री रामकिशोर नानो कावरे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी वैयक्तिकरित्या प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत घोषीत केली आहे.